SRUSHTIKON

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 

 
 


 

सृष्टिकोन
अंक १
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to all those who helped me during the compilation and for the help and guidance during the workshop.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला
निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे. सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे.
 

 

““
 
सृष्टिकोन १० : रातवा एक निशाचर पक्षी
 
रातवा एक निशाचर पक्षी आहे. हा पक्षी रात्री सक्रिय असतो. रातवा दिवसा आराम करतो. रातवा छोटे पतंग, किडे खातो. त्याच्या अंगावर ठिपके व रेघांचे अदभुत डिझाइन असते. त्यामुळे तो जमिनीवरकिंवा झाडावर बसलेला असताना पटकन दिसुन येत नाही. त्याचे रंगरुप झाडाच्या सालीत व पालापाचोळ्यात लपते. यामुळे या पक्ष्यांना, दिवसा आराम करणे सोपे होते. रात्री हे पक्षी बऱ्याचदा जमिनीवर बसलेले दिसतात. पृथ्वीवर रातव्यांच्या ८० जाती आहेत. त्यांचे रहाणीमान एकसारखे असले तरी, रंगरुप, आकार, अधिवास यात फरक आहे. भारतात ९ जातीचे रातवे आढळतात. त्यात प्रामुख्याने भारतीय रातवा, करडा जंगल रातवा, सव्हाना रातवा, जेर्डॉन रातवा, इजिप्शियन रातवा, युरेशियन रातवा, मोठया कानांचा रातवा, साइक्स रातवा, मोठया शेपटाचा रातवा असे प्रकार आहेत.
या ९ जातींपैकी ५ जातींचे रातवे सह्याद्री परिसरात आढळतात. (भारतीय रातवा, जंगल करडा रातवा, जेर्डॉन रातवा, सव्हाना रातवा व मोठया कानांचा रातवा). रातवे जरी सह्याद्रीत अंतर्जन्य नसले तरी त्यांचे पर्यावरणाच्या सृष्टीशृंखलेत महत्वाचे स्थान आहे. भारतीय रातवा आकाराने लहान असतो, त्याच्या पखांवर तपकिरी ठिपके असतात. मोकळ्या माळावर व डोंगरांच्या पायथ्याला तो आढळतो. रातव्याच्या रात्री च्या संचारामुळे घुबडांसारख्याच त्यांच्या बाबतीत बऱ्याच गैरसमजुती व अंधश्रद्धा आहेत. करडा जंगल रातवा आकारने मोठा असतो. त्याच्या करड़्या रंगरुपावर काळे, तपकिरी ठिपके असतात. कापु कापु कापु असे तो ओरडतो. शहरातल्या प्रकाशाच्या झगमगाटामुळे रातव्यांना येथुन पळ काढावा लागला आहे.
 

 

““
 
सृष्टिकोन ९ : सुर्याची तिरपी किरण जेंव्हा गवताळ माळरानावर पडतात
 
सुर्याची तिरपी किरण जेंव्हा गवताळ माळरानावर पडतात तेंव्हा सोनेरी जरीला सुद्धा लाजवेल अशी त्याची झळाळी असते. ओसाड दिसणाऱ्या माळरानावर लहान मोठया पाखरांची चहलपहल सुरु होते. थंडी पडल्यावर उत्तरेकडच्या शुष्क प्रदेशांतुन आलेल्या पाहुण्यांचे थवे माळावर अचानक उंचावतात. आकाश विविध जातींच्या चंडोल पक्ष्यांच्या उंच भराऱ्यांनी जीवंत होते. मुरारी पक्षी मंजुळ शीळ वाजवु लागतात. कुठुन तरी उडत उडत आलेल्या भाट तित्तरांच्या जोड़्या गवतावर उतरतात. गवताचे बी टिपत टिपत गवतात चालता चालता त्या गवतात हरवुन जातात. दुपारी माळावर खेळ करणारे डोंबारी पक्षी माळावर विखुरलेल्या दगडांवर उन्ह खात बसलेले दिसतात. कोरफडीच्या शेंड़्यांवर गप्पीदास आपली शान दाखवत बसलेले दिसतात. हिरवे लहान राघू भुंगे, चतुर यांना पकडण्यासाठी हवेत करामत करतात. कोतवाल आपल्या इलाख्याची निगराणी करतात. उत्तरेकडुन आलेले विविध जातींचे बंटिंग बाजरीच्या कणसांवर आपला हिस्सा खाण्यात मग्न असतात. तित्तिर, लावा पक्षी शेतांच्या बांधावरच्या गवतात दडत दडत अचानक रस्ता ओलांडताना दिसतात. हवा तापण्याची वाट पहात लहान टेकड़्यांच्या टोकांवर कझाकी स्टेप गरुड शांत बसलेले आढळतात.
चिंकारा हरणे लहान कळपात सावध सावध डोंगराच्या बाजु बाजुने चरताना दिसतात. कापशी घार हवेत एकाच ठिकाणी फडफड करत शिकारीची तयारी करताना दिसते. ससाणे माळावरच्या मीटर भर उंच आकाशातुन आपले सावज शोधत तरंगतात. रात्र भर शिकार शोधुन शोधुन दमलेले तरस, कोल्हे, लांडगे आपल्या आपल्या जमिनीखालच्या अड़्यांमध्ये निजलेले असतात. अचानक गवतात लगभग होते. १०-१२ धावक पक्षी गवतात दुडदुडत किडे शोधु लागतात. बांधावरचे पिवळ्या गालाच्या माळ टिटव्या निरिक्षण करु लागतात. एव्हाना ससे शोधत शोधत कझाकी स्टेप गरुड आकाशात रिंगण घालु लागतात. इकडे धनगराची पुढचे पाय बांधलेले चार भीमथडी घोडे गवतावर चरत चरत येतात. बाभळीच्या काटेरी वाघुरातून धनगराच्या शेळ्या मेंढ्याचा कळप बाहेर पडतो. त्यांच्या मागे मागे दोन रंगीत पागोटी, एक गडद लाल आणी एक गडद गुलाबी संगतीने बाहेर पडतात. पागोटयांच्या खाली जाड मिश्या असतात. संगतीला घोंगडी, लांब निमुळते शेकाटे असा लवाजमा माळापल्याडच्या डगरीवरुन पुढे दिसेनासा होतो. सोनेरी माळावरची थंड हवा एव्हाना तापु लागते. माळरानांवर आता कुंपणे आली आहेत. वाट अडल्याने चिंकारे चिंतेत दिसतात. गवतावरचे चार मीटर उंच आकाश आपली दुनिया समजणारे ससाणे कुठे तरंगणार हा अजुन एक प्रश्न आहे.

 

 

““
 
सृष्टिकोन ८ : सेरोपेजिआ ह्युबेरी कंदिलपुष्प
 
सेरोपेजिआ नावाच्या वनस्पतीच्या वंशात विविध जाती व उपजाती आहेत. यातील बहुसंख्य जाती दुर्मिळ असुन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याच वंशामधील, सेरोपेजिआ ह्युबेरी जातीची वनस्पती आपल्या सह्याद्रीतील एक महत्वाची अंतर्जन्य वनस्पती आहे. सह्याद्रीतील अंतर्जन्य म्हणजे फक्त सह्याद्रीत आढळते. जगात इतरत्र आढळत नाही. सेरोपेजिआ ह्युबेरी पावसाळ्यात आढळते. याची उंची २० सेमी असते, व वेली जमिनीलगत पसरते. सेरोपेजिआ ला मराठीत खर्चुडी, खर्पुडी, कंदिलपुष्प वनस्पती अशी नावे आहेत. ह्युबेरी कंदिलपुष्पाच्या वेली असतात. डोंगराळ प्रदेशात समुद्रसपाटी पासुन ८००-१००० मीटर उंचीवर या लहान वेली आढळतात. सह्याद्रीतील कोल्हापुर, सातारा व पुणे जिल्ह्यात ह्युबेरी कंदिलपुष्पाच्या वेली आढळल्या आहेत. य़ा वनस्पतीची पाने लांबट असतात. फुले लहान असतात. त्यांचा आकार अंदाजे १ से मी असतो. पाकळ्यांचा आभास छत्रीसारखा आहे. पावसाचे थेंब या पाकळ्यांवरुन ओघळुन जातात. फुलाला बाजुने पाच प्रवेशद्वारे असतात. या प्रवेशद्वारांचा आकार विशिष्ट आकारापेक्षा लहान माश्यांनाच आत प्रवेश देण्याच्या दृष्टीने आयोजला असावा. लहान दोन पंखांच्या माश्या पाकळ्यांवर उतरतात. मग बाजुच्या प्रवेशद्वारांमधुन फुलाच्या अंतर्भागात म्हणजे कंदिलात या माश्या आत शिरतात.
बऱ्याच कंदिलपुष्पात फुलांमधुन येणाऱ्या कुजट वासामुळे या दोन पंखी माश्या आकर्षित होतात. कुजलेल्या व मेलेल्या अवशेषांवर या माश्या नेहेमी आपले खादय शोधतात. कंदिलपुष्प कुजलेला वास वापरुन अशा माश्यांना आकर्षित करतो, व आपले परागीभवन करण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीचे फसवे तंत्र वापरण्याला इंग्रजीत डिसेप्शन असे म्हणतात. ह्युबेरी कंदिलपुष्पाच्या फुलांचा रंग कंदिलाकडे जांभळा व पाकळ्यांकडे सफेद असतो. कंदिलातील रचनेमुळे व तंतुंमुळे माशी आत गुंतते. परागीभवन करण्यात माशी वेलीची मदत करते. माशी थोड़्या वेळाने बाहेर पडते. माशीला गुंतवण्यासाठी फसवे गुंतवणे व आपले परागीभवन साध्य करणे या वेलीची खासीयत आहे. पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणुन या कंदिलपुष्पाने पाकळ्यांचा अजब आकार विकसलेला दिसतो. या वनस्पतीच्या संरचनेकडुन आणी त्याच्या कार्यप्रणालीतुन माणसाला बरेच शिकण्यासारखे आहे. या लहान वेली दुर्मिळ आणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन होणे महत्वाचे आहे. ठराविक आकाराच्या व प्रकारच्या माश्यांना प्रवेश देण्याच्या संकुचित पद्धतीमुळे कंदिलपुष्प वेली दुर्मिळ होत आहेत का ? हा एक प्रश्न आहे.

 

 

““
 
सृष्टिकोन ७ : पाखुर्डी (भाट तित्तर) मादी
 
भारतात पक्ष्यांच्या एकूण १२६६ जाती आहेत. जगातील एकूण पक्ष्यांपैकी अंदाजे १२ % जाती भारतात आढळतात. भारताच्या मध्य भागात गवताळ माळराने आहेत. शुष्क ओसाड माळरानांवर बरेच अनोखे जीव रहातात. एकेकाळी या माळरानांवर चित्त्यांचे राज्य होते. चित्ते शिकारीमुळे नामशेष झाले. माळावर रहाणाऱ्या माळढोक, तृणमोर यांची संख्या कमी कमी होत आहे. माळरानांवर रहाणारे तरस, कोल्हे, लांडगे, काळविट, चिंकारा हरणे यांची संख्या रोडावत आहे. गवताळ माळरानांवर माणसाने मोठया प्रमाणात अतिक्रमण चालु केले आहे. माळरान म्हणजे ओसाड जमिन अशी सर्वसाधारण धारणा आहे. भारताच्या या माळरानांवर असंख्य लहान मोठे पक्षी रहातात. उघड़्यावर आपल्यावर शिकारी प्राण्यांची व शिकारी पक्ष्यांची नजर पडु नये म्हणुन बऱ्याच माळरानांवर रहाणाऱ्या पक्ष्यांची रंगसंगती आजुबाजुच्या जमिनीशी जुळती मिळती असते. य जमिनीवर वावरणाऱ्या पक्ष्यांच्या अगदी जवळ गेले तरी ते आपल्याला दिसत नाहीत.
जवळ गेल्यास अचानक उडतात व दूर जाऊन जमिनीवर उतरतात आणी पुन्हा एकदा जमिनीशी मिळत्याजुळत्या रंगांमुळे दिसेनाशे होतात. या प्रकाराला इंग्रजीत कॅमोफ्लोज असे म्हणतात. असा रंगछळ करणाऱ्या पक्ष्यांमध्ये पाखुर्डी, तित्तिर, लावा यांच्या विविध जाती माहिर आहेत. पाखुर्डीच्या दोन जाती आपल्या माळरानांवर आढळतात. साधी आणी रंगीत पाखुर्डी या पाखुर्डी च्या दोन जाती आपल्या महाराष्ट्रातील माळरानांवर दिसतात. नर मादी च्या जोडी जोडी ने दिसणारे पाखुर्डी (भाट तितर) पक्षी इंग्रजीत "चेस्ट्नट बेलीड सॅन्ड्ग्राउज" या नावाने ओळखले जातात. नर मादी फिकट तपकिरी रंगाचे असतात. त्यांच्या पिसांवर फिक्या व गडद करड़्या रंगाची नक्षी असते. त्यांच्या या रंगछळामुळे ते आजुबाजुच्या जमिनीत मिसळुन जातात. उष्ण वाळवंटी आणी माळरानांवर रहाणारे हे पक्षी जमिनीवर घरटे करतात. गवताचे व लहान वनस्पतींचे बीज हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. हे पक्षी भारत आणी अफ्रिकेच्या माळरानांवर आढळतात.

 

 

““
 
सृष्टिकोन ६ : पश्चिम घाट - कुर्ग : (बेडुक)
 
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये निक्टिबॅट्रचस जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.

बेडकांबद्दल महत्वाच्या १० बाबी,
१) बेडुक पाण्याजवळ किंवा पाण्यात रहातात. ते प्रदुषणाचे निर्देशक आहेत. जलप्रदुषणामुळे बेडुकांची संख्या कमी होते आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे व इतर रसायनांमुळे जलप्रदुषण होते.
२) बेडकांचे लहान अधिवास मोठया जंगलाच्या अधिवासाचे लहान भाग असतात. झाडे, तलाव, डबकी, झुडुपे, झरे व ओढे, दगड धोंडे असे विविध अधिवास विविध बेडकांना आश्रय देतात. या सर्व घटकांचे संवर्धन म्हणजेच बेडकांचे संवर्धन होय.
३) पश्चिम घाटात दिसणारे बहुतांश बेडुक अंतर्जन्य आहेत. त्यांचा अधिवास पश्चिम घाटापुरता मर्यादीत आहे. पश्चिम घाटाचे संवर्धन म्हणजे त्यांचे संवर्धन होय.
४) जलप्रदुषण, शेतकी प्रगती, बुरशी रोगराई, अधिवासाचा विनाश अशा कारणांमुळे बेडुक कमी होत आहेत.
५)बेडुक हा खाद्यश्रुंखलेतला महत्वाचा घटक आहे. लहान किडे, डास यांना खाद्य करुन तो त्यांच्या संख्येवत नियंत्रण ठेवतो.
६) बेडुक पावसाळ्या व्यतिरिक्त काळात सुप्त (हायबरनेट) होतात.
७) बेडुक पावसाळ्यात अंडी टाकतात.
८) सह्याद्रीत आढळणाऱ्या बेडकांमध्ये बरेच बेडुक संकटात आहेत. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणाप्रमाणे या बेडकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.
९) वाघ, सिंहांवर जेवढे पैसे खर्च केले जात आहेत, त्यामानाने बेडकासारख्या लहान पण तितक्याच मह्त्वाच्या प्राण्यांकडे सर्वच दुर्लक्ष करत आहेत.
१०) पश्चिम घाटात सध्या काही नविन बेडकांचे शोध लागले आहेत. बऱ्याच जातींवर संशोधन चालु आहे.

१) निक्टिबॅट्रचस ग्रॅन्डिस
पश्चिम घाटामध्ये, कर्नाटकाच्या कोडगु जिल्ह्यात, कुर्ग भागात, बेडकांचे विविध लघु अधिवास आहेत. गवताळ डोंगर, सदाहरित जंगल, शोला जंगल, लहान झुडपे, पाणथळ डबकी, झरे, माणसाने लावलेली कॉफी ची लागवड असे अनेक लहान मोठे अधिवास असल्याने येथे बेडकांच्या विविध जाती आढळतात. या बेडकांमध्ये निक्टिबॅट्रचस जातीचे पाण्यांच्या प्रवाहाजवळ दगडावर रहाणारे बेडुक सुद्धा आहेत. सतत होणाऱ्या जंगलतोडी मुळे या फ्रॉग्स ची संख्या कमी होत आहे. जंगलतोड करुन विस्तारली गेलेली शेती व अनियंत्रित पर्यटन त्यांच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत.
या विविध फ्रॉग्स मध्ये निक्टिबॅट्रचस ग्रॅन्डिस नावाचा एक मोठया आकाराचा बेडुक आहे. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, पाण्याच्या ओढ्यांलगत आढळतो. हा बेडुक निशाचर आहे. याला वायनाड निशाचर बेडुक असे म्हणतात. त्याचे प्रजनन जंगलात ओढ्यांजवळ होते. त्याच्या अंगावर सुरकुत्या असतात. त्याच्या डोळ्यांमधले बुबुळ चौकोनी असते. हा बेडुक सह्याद्रीत अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे.

२) इन्डोसिल्व्हेनिविराना मोन्टाना
इन्डोसिल्व्हेनिविराना मोन्टाना हा सह्याद्रीत अंतर्जन्य असलेला बेडुक आहे. तो कर्नाटक राज्यात सह्याद्रीच्या जंगलांमध्ये समुद्रसपाटीपासुन ८०० ते १२०० मीटर उंचीवर आढळतो. त्याचे वास्तव्य चिकमंगलुर, कोडागु व हसन राज्यात आहे. त्याचा आकार ५४ ते ७५ मि मि असतो. हा बेडुक पाणथळ ठिकाणी डबक्यांमध्ये दिसतो.

३) निक्टिबॅट्रचस सॅन्कटिपालुस्ट्रिस
निक्टिबॅट्रचस सॅन्कटिपालुस्ट्रिस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, पाण्याच्या लहान ओढ्यांलगत आढळतो. हा बेडुक निशाचर आहे. याला कुर्ग निशाचर बेडुक असे म्हणतात. त्याचे प्रजनन जंगलात ओढ्यांजवळ होते. त्याच्या अंगावर सुरकुत्या असतात. त्याच्या डोळ्यांमधले बुबुळ चौकोनी असते. हा बेडुक सह्याद्रीत अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणाप्रमाणे हा बेडुक "एन्डेन्जर्ड" आहे. याचा अर्थ या बेडकाची संख्या कमी होत असुन त्याच्या अधिवासाला संरक्षणाची गरज आहे. थोडा तपकिरी छटा असलेला हा करडा बेडुक कर्नाटक राज्यात पश्चिम घाटांमधील जंगलात १२०० मीटर उंची च्या आसपास आढळतो.

४) मिक्रिक्झेलस सॅक्सिकोला
मिक्रिक्झेलस सॅक्सिकोला हा एक अंतर्जन्य असलेला बेडुक आहे. तो कर्नाटक राज्यात सह्याद्रीच्या जंगलांमध्ये समुद्रसपाटीपासुन ४०० ते १४०० मीटर उंचीवर आढळतो. हा बेडुक पाण्याच्या प्रवाहाजवळ दगडांवर दिसतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गिकरणाप्रमाणे तो "व्हलनरेबल" आहे. त्याच्या अधिवासाला संरक्षणाची आवश्यकता आहे. पावसाळ्याच्या सुरवातीस हा बेडुक आपले प्रजनन सुरु करतो. नर बेडुक मादीला आकर्षित करण्यासाठी आवाजाबरोबर आपले मागचे पाय उंचावुन नाच करतो.

५) निक्टिबॅट्रॅचस मिनिमस
निक्टिबॅट्रॅचस मिनिमस नावाचा एक अत्यंत लहान आकाराचा टोड बेडुक आहे. याचा आकार १० ते १४ मि. मि. असतो. हा बेडुक सदाहरित दमट शोला जंगलात, पाणथळ दलदली जवळ पानगळीत आढळतो. हा बेडुक रात्री सक्रिय असतो. याला मिनिमस बेडुक असे म्हणतात. त्याचे प्रजनन जंगलात पाणथळ ठिकाणी होते. हा बेडुक सह्याद्रीत अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणाप्रमाणे हा बेडुक "डाटा डिफिशियन्ट" आहे. याचा अर्थ या बेडकाचा अभ्यास होणे आवश्यक असुन याच्या अधिवासाची व वास्तव्याची पुर्ण माहिती अजुन उपलब्ध नाही. हा बेडुक थोडा अजब आहे. याचा आकार अत्यंत लहान आहे. तो भारतातला सर्वात लहान बेडुक आहे. त्याच्या बोटांमध्ये पडदे नसतात. तो बेडुक पाणथळ भागात असुन सुद्धा त्याला पडदे नसतात. तो अत्यंत लहान असतो व त्याला पाण्याबाहेर रहातो. हा बेडुक रात्री अवाज करुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे डोळे करडे तपकिरी असतात. रंगाने तो करडा तपकिरी असतो.

६) घाटोफ्राइन ओर्नाटा
कुर्ग भागात घाटोफ्राइन ओर्नाटा नावाचा एक मध्यम आकाराचा टोड बेडुक आहे. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, पाण्याच्या ओढ्यांलगत आढळतो. हा बेडुक रात्री व दिवसा सक्रिय असतो. याला मलबार टोरेंट टोड किंवा काळा टोरेंट टोड असे म्हणतात. त्याचे प्रजनन जंगलात ओढ्यांजवळ होते. हा बेडुक सह्याद्रीत अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणाप्रमाणे हा बेडुक "एन्डेन्जर्ड" आहे. याचा अर्थ या बेडकाची संख्या कमी होत असुन त्याच्या अधिवासाला संरक्षणाची गरज आहे. हा बेडुक थोडा अजब आहे. रंगाने काळापट तपकिरी करडा असा हा बेडुक पोटाकडे मात्र भडक रंगाचा आहे. याच्या पोटावर लाल रंगावर पिवळे मोठे ठिपके असतात. तसेच याच्या हनवटीच्या खालच्या बाजुस पिवळे ठिपके असतात. संकट प्रसंगी जेंव्हा याच्यावर हल्ला होतो तेंव्हा हा उलटा पडतो. पोट वर करुन तो मेल्याचे सोंग करतो. त्याच्या पोटावरच्या भडक रंगांकडे पाहुन हल्ला करणाऱ्या सापाच्या किंवा इतर प्राण्याला तो विषारी असल्याचा संशय येतो. या मुळे त्याचे प्राण वाचु शकतात. असे करताना तो पोट फुगवतो व अजिबात हालचाल करत नाही.

८) राओर्चेस्टेस अनिली
राओर्चेस्टेस अनिली नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार २४-२९ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये जमिनीपासुन १ ते २ मीटर उंचीपर्यंत असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. समुद्रसपाटीपासुन १००० ते १५०० मीटर उंचीवर असलेल्या सह्याद्रीच्या कर्नाटक व केरळ राज्यात पलक्कड गॅप च्या दोन्ही बाजुस आढळतो. हा बेडुक मनुष्य वस्तीजवळ सुद्धा आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "लिस्ट कन्सर्न" असा वर्ग देण्यात आला आहे. या बेडकाला सध्या धोका कमी असुन त्यांची संख्या टिकुन आहे.
या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. सुर्यास्तानंतर तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट लाल असुन त्याभोवती करडे वर्तुळ असते. डोळ्यांमधले बुबुळ काळपट तपकिरी असते. हा बेडुक रंगाने फिकट तपकिरी असतो. त्याच्या अंगावर गडद तपकिरी खुणा असतात.
टिक.....टिक.....टिक.....टिक.... .टिक.....टिक....टिक....टिक.... टिक..टिक..टिक..टिक्टिक्टिक्टिक असा आवाज काढतो. हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.

९) राओर्चेस्टेस लुटेलॉस
राओर्चेस्टेस लुटेलॉस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याला निळ्या डोळ्यांचा पिवळा बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार ३०-३४ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये जमिनीपासुन १ ते ४ मीटर उंचीपर्यंत असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ९०० ते ११०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो.
आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "डाटा डिफिशियंट" असा वर्ग देण्यात आला आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. सुर्यास्तानंतर तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
या बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट सोनेरी असुन त्याभोवती निळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी पिवळा असतो. त्याच्या अंगावर अस्पष्ट तपकिरी पट्टे असतात. पोटाकडे पिवळ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.
हा बेडुक हा बेडुक ट्र्र्र्र्र्र्र्र टक टक टक टक टक टक टक असा आवाज काढतो. हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही..

१०, ११) राओर्चेस्टेस ग्लॅंडुलस
राओर्चेस्टेस ग्लॅंडुलस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. ग्लॅंडुलस बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार २२-२७ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो. त्याचे वास्तव्य लहान झुडुपांमध्ये व झाडांवर जमिनीपासुन अंदाजे ४ मीटर उंचीवर असते. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते.
कर्नाटक (दक्षिण) व केरळ (पलक्कड गॅप च्या उत्तरेस) राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ४०० ते २००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "व्हलनरेबल" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ ह्या बेडकाचे अस्तित्व कमी होत आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग पिवळट सोनेरी असुन त्याभोवती निळे/काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळा/करडा असतो. या बेडकामध्ये विविश रंगछटा आढळतात. त्याच्या अंगावर अस्पष्ट ठिपके असतात. पोटाकडे पिवळ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.
हा बेडुक टि..टि..टि..............टि..टि..टि............टि..टि..टि असा आवाज काढतो. हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.

१२) राओचेस्टस पोनमुडी
राओचेस्टस पोनमुडी नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. त्याला पोनमुडी बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार ३९-४३ मी.मी असतो. नर आकराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात व त्याच्या आजुबाजुस आढळतो.
त्याचे वास्तव्य मुख्यत: गवताळ प्रदेशाजवळच्या जंगलात जास्त आढळतो. अगस्त्यमाला डोंगररांगेतल्या पोनमुडी डोंगरावरुन याचे नाव पडले आहे. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन १००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "क्रिटिकली एनडेन्जरड" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ या बेडकाचे अस्तित्व अत्यंत कमी होत आहे. हा बेडुक नामशेष होण्याच्या जवळ पोहोचला असुन त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे.
या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग तपकिरी असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी असतो. पोटाकडे पांढऱ्या रंगावर तपकिरी जाळीदार नक्षी असते.
हा बेडुक ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट..............ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट............ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ड्ट्ट असा आवाज काढतो. हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.

१३) राओर्चेस्टेस क्रोमासिंकिसी
राओर्चेस्टेस क्रोमासिंकिसी नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. त्याला कन्फ्युजिंग बुश फ्रॉग असे म्हणतात. याचा आकार २७-३० मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो.
या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन १००० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "व्हलनरेबल" असा वर्ग देण्यात आला आहे. याचा अर्थ या बेडकाचे अस्तित्व कमी होत आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर व जमिनीवर रहातो. तो निशाचर आहे. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो. माणसाच्या व इतर ध्वनि प्रदुषणाचा त्याच्यावर विपरित परिणाम होतो.
त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या बेडकाचे तोंड निमुळते असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळट तपकिरी किंवा पिवळा किंवा हिरवा असतो. त्याच्या विविध रंगछटांमुळे त्याला कन्फ्युजिंग बुश फ्रॉग म्हणतात.
हा बेडुक टिड्टिड्टि.......टिड्टिड्टि.......टिड्टिड्टि....... असा आवाज काढतो. हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.

१४) राओर्चेस्टेस ट्युबरेह्युमरस
राओर्चेस्टेस ट्युबरेह्युमरस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार २२-२४ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो. या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात (पल्लकड गॅप च्या उत्तरेस सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ९०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "डाटा डिफिशियन्ट" असा वर्ग देण्यात आला आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर रहातो. तो निशाचर आहे. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो.
त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने तपकिरी असतो. या बेडकाच्या हातांजवळ एक हाड असते. त्यामुळे त्याला नॉब हॅन्डेड बुश फ्रॉग असे म्हणतात. हा बेडुक टिटिटि.......टिटिटि.......टिटिटि....... असा आवाज काढतो. हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.

१५, १६ ) राओर्चेस्टेस चेरिअस
राओर्चेस्टेस चेरिअस नावाचा एक मध्यम आकाराचा बेडुक आहे. याचा आकार १५-४५ मी.मी असतो. नर आकाराने लहान असतो. मादी तुलनेने आकारात मोठी असते. हा बेडुक मध्यम पानगळीच्या किंवा सदाहरित दमट जंगलात, शोला जंगलात आढळतो. तो झाडावर किंवा जमिनीवर पानगळीत आढळतो.
या बेडकांच्या अंड़्यांमधुन बेडकाचा जन्म होतो. यात टॅड्पोल अवस्था नसते. कर्नाटक (दक्षिण) व केरळ राज्यात सह्याद्रीत समुद्रसपाटीपासुन ८००-१२०० मीटर उंचीवर असलेल्या जंगलात तो आढळतो. आय यु सि एन संस्थेच्या वर्गीकरणात या बेडकास "एन्डेंजर्ड" असा वर्ग देण्यात आला आहे. त्याच्या अधिवासाला संवर्धनाची गरज आहे. या बेडकांचा अजुन खुप अभ्यास होणे अपेक्षित आहे. या बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे तो झाडावर व जमिनीवर रहातो. पावसाळ्यात तो जमिनीलगत झुडुपावर किंवा जमिनीचरच्या पानगळीत दिसतो. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांना बोटांच्या टोकांना लहान तबकड़्या असतात. या तबकड़्यांचा वापर बेडुक झाडांवर चढण्यास करतो. त्याच्या मागच्या पायांच्या बोटांमध्ये क्वचित प्रसंगी पोहोण्यासाठी अगदी लहान पडदे असतात. नराला मानेजवळ एक फुगा असतो. रात्री उशिरा तो फुगा फुगवुन मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या बेडकाचे तोंड गोलाकार असते. डोळ्यांचा रंग सोनेरी पिवळा असुन त्याभोवती काळे वर्तुळ असते. डोळ्यांमधले अंडाकार बुबुळ काळे असते. हा बेडुक रंगाने पिवळ असतो. हा बेडुक टिक.......टिक.......टिक....... असा आवाज काढतो. हा बेडुक पश्चिम घाटात अंतर्जन्य (एन्डेमिक) आहे. सह्याद्री बाहेर इतरत्र हा बेडुक आढळत नाही.

 

 

““
 
सृष्टिकोन ५ : कॉमन रोजफिंच (गुलाबी चिमणी)
 
भारतात पक्ष्यांच्या एकुण १२६६ जाती आहेत. जगातील पक्ष्यांच्या एकुण जातींपैकी अंदाजे १२ % पक्ष्यांच्या जाती भारतात आढळतात.

कॉमन रोजफिंच हा एक चिमणीपेक्षा थोडा मोठा पक्षी आहे. याला मराठीत सर्वमान्य नाव नाही. आपण याला गुलाबी चिमणी असे संबोधु शकतो. या जातीचा नर पक्षी रंगाने लाल गुलाबासारखा असतो. म्हणुन या पक्ष्याला रोजफिंच असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत याला “कार्पोडेकस एरिथ्रिनस” असे म्हणतात. रोजफिंच कुळात १५ जातीचे पक्षी भारतात आढळतात. यातले बहुसंख्य पक्षी हिमालयात आढळतात. कॉमन रोजफिंच किंवा गुलाबी चिमणी उन्हाळ्यात विणीच्या हंगामात हिमालय, युरोप, सैबेरिया, मध्य आशिया मध्ये आढळतो. तर हिवाळ्यात हा पक्षी भारतात पठारी भागात आढळतो.

गुलाबी चिमणी अंदाजे १४ ते १५ से.मी. आकाराची असते. हा आकार म्हणजे पक्ष्याच्या चोची पासुन शेपटाच्या टोकापर्यंत अंतर होय. या पक्ष्याची चोच चिमणीसारखी आखुड पण जाड शंखुसारखी असते. या आकारामुळे पक्ष्याला गवताच्या व इतर लहान बिया खाणे सोपे होते. या पक्ष्याच्या नर व मादीमध्ये रंगरुपात मोठा फरक असतो. अश्या फरकाला सेक्शुअल डायमोरफिजम असे म्हणतात.

नर पक्षी रंगाने गुलाबी लाल असतो. त्याचे डोके, छाती व पाठ गुलाबी असते. पक्ष्याचा पाठीकडच्या भागाला गुलाबी छटा असते. पोटाकडे पांढरट करड़्या रंगावर गुलाबी रेघा असतात. या पक्ष्याच्या पाच उपजाती आहेत. या उपजातींमध्ये रंग छटा थोड़्या वेगवेगळ्या असतात. नर पक्ष्याच्या डोळ्याभोवतीचा रंग थोडा तपकिरी असतो. त्याचे डोळे तपकिरी असतात. त्याचे पाय गुलाबी तपकिरी असतात.

मादी पक्षी रंगाने हिरवट करड़्या रंगाचा असतो. मादीच्या डोक्यावर, पोटाकडे हिरव्या रेघा असतात. पाच पोटजातींच्या मादींमध्ये फार लहान फरक आहे. नर व मादी पक्ष्यांची शेपटी दोन टोकाची असते. या पक्ष्याची पिल्ले एक दिड वर्षाची असे पर्यंत मादी सारखी दिसतात. त्यांच्या पोटावरच्या रेघा गडद असतात.

या पक्ष्याच्या ५ उपजाती आहेत. एरिथ्रिनस, ग्रेबिनिट्स्की, कुबानेन्सिस, फरघानेन्सिस व रोजेअटिस अशी या पाच उपजातींची नावे आहेत. यातील चार उपजाती भारतात आढळतात. एरिथ्रिनस, कुबानेन्सिस, फरघानेन्सिस व रोजेअटिस या चार उपजाती भारतात आढळतात.

एरिथ्रिनस उपजातीचे पक्षी विणीसाठी उत्तर व पूर्व युरोप, पश्चिम सैबेरिया, युक्रेन, मंगोलिया मध्ये जातात. हिवाळ्यात ते भारत, थायलंड ला स्थलांतर करतात. कुबानेन्सिस उपजातीचे पक्षी विणीसाठी तुर्कस्तान, कोकेशियस, इराण, तुर्कमेनिस्तान येथे जातात. हिवाळ्यात ते भारतात स्थलांतर करतात. फरघानेन्सिस उपजातीचे पक्षी विणीसाठी कझाकस्तान, किरगिझस्तान, पश्चिम चीन, अफगाणीस्तान, वायव्य हिमालय येथे जातात. हिवाळ्यात ते वायव्य भारतात स्थलांतर करतात. रोजेअटिस उपजातीचे पक्षी विणीसाठी मध्य व ईशान्य हिमालय, तिबेट, ब्रह्मदेश येथे जातात. हिवाळ्यात ते वायव्य भारत, बह्मदेश, थायलंड, लाओस, व्हिएतनाम आणी आग्नेय चीन मध्ये स्थलांतर करतात.

गुलाबी चिमणी हिवाळ्यात मध्य व दक्षिण भारतात आढळते. युरोप, सैबेरिया, मध्य आशिया मधुन आलेल्या चार उपजातींचे पक्ष्यांचे थवे भारतात हिवाळ्यात पसरतात. हे पक्षी गवताचे बी, फुलांमधले मध, पराग, व लहान फळे खातात. मे ते सप्टेंबर या काळात ते उत्तरेकडे विणी साठी जातात. हे पक्षी लहान झाडांवर गवतापासुन घरटे बनवतात.

हिमालय, युरोप, सैबेरिया, मध्य आशिया व उत्तरेकडील थंड प्रदेशातुन दर हिवाळ्यात स्थलांतर करुन पक्षी मध्य व दक्षिण भारतात येतात. दर हिवाळ्यात उत्तरेकडच्या भागातले पाणथळी राहणारे पक्षी दक्षिणेकडे पाणथळ प्रदेशात स्थलांतर करतात. दर हिवाळ्यात उत्तरेकडचे शुष्क प्रदेशात राहणारे पक्षी दक्षिणेकडे शुष्क प्रदेशात स्थलांतर करतात. तसेच दर हिवाळ्यात उत्तरेकडचे जंगलात राहणारे पक्षी दक्षिणेकडे जंगलात स्थलांतर करतात.

दोन्ही प्रदेशात हवामानाप्रमाणे स्थलांतर करणाऱ्या कॉमन रोजफिंच या पक्ष्यासाठी दोन्ही प्रदेशामधले अधिवास टिकवुन ठेवणे मात्र आपल्यावर म्हणजे मनुष्यजातीवर अवलंबुन आहे.

 

 

““
 
सृष्टिकोन ४ : कृष्णा नदीचे खोरे
 
सह्याद्रीच्या डोंगररांगा दक्षिण गुजरात पासुन केरळ पर्यंत पसरल्या आहेत. दरवर्षी होणाऱ्या हंगामी पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांतुन असंख्य ओढे पुर्वेकडे दख्खन च्या पठाराकडे आणी पश्चिमेकडे चिंचोळ्या पश्चिम किनारपट्टी कडे वाहतात. या ओढ्यांचे रुपांतर लहान मोठया नदयांमध्ये होते. अनेक लहान नदया मिळुन मोठया नद्या तयार होतात.

महाराष्ट्रातील सातारा आणी कोल्हापुर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधुन अनेक लहान नदयांचा उगम होतो. या भागातील पुर्वेकडे वाहणाऱ्या उपनदया कृष्णा नदीस येऊन मिळतात. पुढे कर्नाटक राज्यात भीमा नदी कृष्णा नदीला मिळते. पुढे दक्षीणेकडुन येणारी तुंगभद्रा नदी, कृष्णा नदीला मिळते. आंध्र च्या किनारपट्टीवर कृष्णा नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.

सह्याद्रीच्या सातारा आणी कोल्हापुर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जुन ते सप्टेंबर च्या काळात अंदाजे ४००० ते ७००० मीलीमीटर पाऊस पडतो. पुर्वेकडे दक्खनच्या पठाराकडे मात्र पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी होते. कृष्णा व तीच्या उपनद्यांमध्ये वाहणारे पाणी मुख्यत: सह्याद्रीच्या डोंगररांगामधे होणाऱ्या पावसामुळे वाहते. घाटमाथ्याकडुन पुर्वेकडे सह्याद्रीच्या काही डोंगररांगा पुर्वेकडे दक्खनच्या पठारावर पश्चिम-पुर्व पसरल्या आहेत.

१) आपण गाडीवाटेने खंबाटकी घाटाने याच महादेव डोंगररांगेला ओलांडतो. महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेकडे भीमेचे खोरे आहे तर दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आहे. महादेव डोंगराच्या दक्षिण बाजुस कमंडला नदीचा उगम होतो. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर ला होतो. कमंडला आणी कृष्णा या पूर्वेला वाहणाऱ्या नद्यांचा संगम धोम धरणाच्या जलाशयात होतो. वाई व भुइंज गावातुन पुढे कृष्णा नदी दक्षिणेकडे वळते. महाबळेश्वर येथे पाच नद्यांचा उगम होतो. येथे उगमाचे द्योतक पंचगंगेचे मंदिर आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, या पूर्वेकडे दक्खन च्या पठारवरुन बंगाल च्या उपसागराकडे वाहणाऱ्या आणी गायत्री व सावित्री या पश्चिमेकडे कोकणातून अरबी समुद्राकडे वाहणाऱ्या नद्यांचा उगम होतो.

२) पाचगणीच्या दक्षिणेला कुडाळी नदीचा उगम होतो. पाचवड गावाजवळ कुडाळी नदी कृष्णेला मिळते.

३)महाबळेश्वर ला उगम झालेली वेण्णा नदी कास डोंगरारांगेच्या उत्तरेकडुन वाहते. या नदीवर कन्हेर धरण आहे. साताऱ्याजवळ वेण्णा नदी कृष्णेला मिळते.

४) उरमोडी नदी कास डोंगरारांगेच्या दक्षिणेकडुन वाहते. या नदीवर उरमोडी धरण आहे. उम्ब्रज जवळ उरमोडी नदी कृष्णेला मिळते.

५) ठोसेघर जवळ उगम झालेल्या तारली नदी वर ठोसेघर येथे धबधबा आहे. उम्ब्रज जवळ तारली नदी कृष्णेला मिळते.

६) महाबळेश्वर ला उगम झालेल्या कोयना नदीवर महाबळेश्वर च्या दक्षिणेकडे कोयना धरण आहे. कोयना जलाशयातून कोकणात पाणी जलविद्युत प्रकल्पामार्गे वसिष्ठी नदीत जाते. वसिष्टी नदी अरबी समुद्राला मिळते. कोयना जलाशयातुन पाणी पूर्वेला कोयना नदीतुन कृष्णा नदीकडे वाहते. केरा, मोरना आणी वांग या कोयनेच्या उपनद्या आहेत. कराड शहरात कोयना आणी कृष्णा या नद्यांचा संगम आहे.

७) वारणा नदीचा उगम चांदोली च्या जंगलात होतो. सांगली शहरात वारणा आणी कृष्णा या नद्यांचा संगम आहे.

८) कोल्हापूर च्या पश्चिमेकडे असलेल्या घाटमाथ्यावरुन येणारी पंचगंगा नदी इचलकरंजी जवळ कृष्णेला मिळते. कासरी, गरवली, जांभळी, सरस्वती, कुंभी, धामणी, तुळशी आणी भगवती या आठ नद्या एकत्र येउन पंचगंगा नदी वाहते.

९) पंचगंगेच्या दक्षिणेकडे घाटमाथ्यावरुन येणाऱ्या दुधगंगा आणी पंचगंगा एकत्र होऊन कृष्णेला मिळतात.

१०) अंबोली ला उगम पावणारी हिरण्यकेशी नदी आणी ताम्रपाणी नदी या घटप्रभा नदीच्या उपनध्या आहेत. गोकाक येथे मार्केंडेय नदी घटप्रभेला मिळते. पुढे बागलकोट जवळ घटप्रभा आणी कृष्णा यांचा संगम आहे.

११) बेळगावच्या दक्षिणेकडे घाटमाथ्यावरुन उगम पावणारी मलप्रभा नदी, बागलकोटजवळ कृष्णेला मिळते.

१२) या व्यतिरिक्त येरला आणी निणी या सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागत उगम पावणाऱ्या नद्या कृष्णेला मिळतात. कर्नाटकात रायचुर जवळ भीमा आणी कृष्णेचा संगम आहे.

सातारा आणी कोल्हापुर जिल्ह्यातील कृष्णा व तीच्या ३१ उपनद्या, असंख्य लहान, मध्यम आणी मोठ्या आकाराचे बंधारे/धरणं यामुळे, दक्षिण महाराष्ट्र जलवैभवी आहे. या पाण्यावर आधरलेले शहरिकरण, बेसुमार औद्योगीकिकरण, शेती आणी अर्थकारण यामुळे दक्षिण महाराष्ट्राचा वेगाने आर्थिक विकास झाला आहे. गेल्या काही वर्षांत विकासाचा प्रवास मात्र वेगाने पश्चिम दिशेकडे घाटमाथ्याकडे होताना दिसतोय. या भागाच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, चांदोली व कोयना अभयारण्यातील वनसंपदेवर माणसाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालु केले आहे. शहरीकरण, जंगलतोड, आणी औद्योगिकिकरण नद्यांच्या उगमस्थळांकडे वेगाने सरकत आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडे घाटमाथ्यावरील जलसंपदा आणी जैवविविधता जर आपण जपली नाही तर त्याचा थेट परिणाम पुर्वेकडे असलेल्या अर्थकारणावर आणी शेतीकरणावर अत्यंत वाईट परिणाम होणार हे साहजिक आहे. पाण्याचे आणी पाण्याच्या स्त्रोताचे महत्व समजुन घेणे महत्वाचे आहे.

 

 

““
 
सृष्टिकोन 3 : निळी टोपीवाला कस्तुर
 
भारतात पक्ष्यांच्या एकुण १२६६ जाती आहेत. जगातील पक्ष्यांच्या एकुण जातींपैकी अंदाजे १२ % पक्ष्यांच्या जाती भारतात आढळतात.
ब्लु कॅप्ड रॉक थ्रश हा लहान हिमालयन पक्षी, हिवाळ्यात सह्याद्रीच्या व पुर्व भारतातील जंगलांमध्ये स्थलांतर करुन येतो.
ब्लु कॅप्ड रॉक थ्रश नर पक्षी रंगाने केशरी व निळा असतो. याचा आकार बुलबुल पक्ष्याएवढा (अंदाजे १७ से. मी.) असतो. या पक्ष्याला मराठीत प्रचलित नाव नसले तरी आपण त्याला निळी टोपीवाला कस्तुर असे म्हणु शकतो. नर आणी मादी पक्षी रंगरुपाने वेगवेगळे असतात. असे वेगवेगळे दिसण्याला इंग्रजीत सेक्शुअल डायमोर्फिजम असे म्हणतात.

नर पक्षी रंगाने निळा आणी केशरी असतो. त्याचा माथा, गळा व मान निळ्या रंगाची असते. त्याच्या पाठीकडचा भाग आणी पोटाकडचा भाग केशरी असतो. त्याच्या पिसांचा भाग निळा, केशरी, सफेद आणी काळा असतो. त्याचे डोळे तपकिरी असतात. पाय पांढरट करडे असतात. त्याची शेपुट निळी असते. त्याची चोच काळी असुन चोचीचा काही भाग पिवळट असतो.

मादी पक्षी रंगाने ओलिव्ह करडा असते. मादी च्या पोटावर गडद तपकिरी करड़्या खुणा असतात. मादी च्या पाठीकडे व माथ्यावर गडद तपकिरी करड़्या खुणा असतात. लहान पिल्ले मादीसारखी दिसतात. निळी टोपीवाला कस्तुर हिवाळ्यात सह्याद्रीच्या जंगलात आढळतो. तसेच तो मध्य व पुर्व घाटातील जंगलात सुद्धा आढळतो.

मे ते सप्टेंबर या उन्हाळयाच्या काळात तो हिमालयाच्या पायथ्याच्या डोंगराळ भागात (१ ते ३ हजार मीटर उंचीवर) विणीसाठी रहातो. पक्षी त्यांचे घरटे जमिनीवर झाडांखाली, दगडांच्या खपचीत करतात. विणी च्या हंगामात मात्र तो त्याची शीळ वाजवतो. हिवाळ्यात हा पक्षी शांत असतो, तो फारसा आवाज करत नाही.

हिमालय व उत्तरेकडील थंड प्रदेशातुन दर हिवाळ्यात स्थलांतर करुन पक्षी मध्य व दक्षिण भारतात येतात. दर हिवाळ्यात उत्तरेकडच्या भागातले पाणथळी राहणारे पक्षी दक्षिणेकडे पाणथळ प्रदेशात स्थलांतर करतात. दर हिवाळ्यात उत्तरेकडचे शुष्क प्रदेशात राहणारे पक्षी दक्षिणेकडे शुष्क प्रदेशात स्थलांतर करतात. तसेच दर हिवाळ्यात उत्तरेकडचे जंगलात राहणारे पक्षी दक्षिणेकडे जंगलात स्थलांतर करतात. हिमालय आणी सह्याद्री दोन्ही डोंगराळ प्रदेशात हवामानाप्रमाणे स्थलांतर करणाऱ्या निळी टोपीवाला कस्तुर या पक्ष्यासाठी दोन्ही डोंगररांगांमधले जंगल टिकवुन ठेवणे मात्र आपल्यावर म्हणजे मनुष्यजातीवर अवलंबुन आहे.

 

 

““
 
सृष्टिकोन २ : ड्रोसेरा बुरमानी (दवबिंदूं) किटकभक्षक वनस्पती
 
ड्रोसेरा बुरमानी (दवबिंदूं) एक लहान किटकभक्षक वनस्पती आहे. या वनस्पतीचा आकार २० ते २५ मिलीमीटर असतो. (अंदाजे १ रुपयाच्या नाण्याच्या आकार). ड्रोसेरा बुरमानी वनस्पती काही क्षणांमध्ये किटकाला चिकट द्रव्याचा वापर करुन पकडते.

या वनस्पतीला फूलाच्या आकारासारखी पाने जमिनीलगत येतात. या पानांवर तंतु असतात. तंतुंच्या टोकावर चिकट द्रव्याचे थेंब असतात. वनस्पतीची रंगसंगती आकर्षक असल्यामुळे, साहजिकच जमिनीवर खाद्य शोधत चालणारे किडे, मुंग्या या वनस्पतीकडे आकर्षित होतात. पानावर येताच पानवजा पाकळ्यांवरचे तंतु आणी त्यावरचे चिकट थेंब किड़्याच्या संपर्कात येतात. किडा धडपड करेल तसे अधिक तंतु किड़्याला चिकटतात आणी किडा अडकतो व त्याला निसटुन जाता येत नाही. चिकट द्राव्यामध्ये एन्झाईम (पाचक द्रव्य) असते. या एन्झाईम (पाचक द्रव्य) चा वापर करुन वनस्पती किड़्याच्या शरीराचे विघटन करुन त्यातले उपयोगी अंश शोषुन घेते.

ड्रोसेरा बुरमानी सारखी अजुन एक वनस्पती आपल्याला आढळते. त्याचे नाव आहे ड्रोसेरा इंडिका. ड्रोसेरा बुरमानी जमिनीलगतचे किडे पकडते तर ड्रोसेरा इंडिका हवेत उडणारे किडे पकडते. या दोन वनस्पती एकाच अधिवासात एकमेकाशी स्पर्धा न करता समायोजन करतात.

ड्रोसेरा बुरमानी चे अजुन एक वैशिष्ट्य आहे. उत्तर पश्चिम घाटातल्या सड़्याच्या पठारांवर त्याला पावसाळ्यानंतर फुले येतात. या वनस्पतीचा किडे पकडण्याचा सापळा जमिनीलगत असतो. फुले मात्र उंच शेंड़्यावर येतात. आपले परागण करण्यास मदत करणारे उडुन येणारे किटक, सापळ्यात पकडले जाऊ नयेत म्हणुन फुलं व सापळा यात अंतर राखण्याची खबरदारी या वनस्पतीने घेतली आहे. फूल असलेला शेंडा ६ ते १५ से.मी. उंच असतो. फूले गुलाबी रंगाची असतात. सड़्याचे डोंगर, खडकाळ पठार, कमी जीवनसत्व असलेल्या जमिनींवर या वनस्पती आढळतात.

समजा आपण एक उडणारा छोटा किडा आहोत. गवताच्या गालिच्यावरुन भरारी मारत फुलांमधील रस गोळा करत उडताना अचानक, तुम्हाला आकर्षक चकाकणारे मध . आकर्षक मध चव घेण्यास खुणावते. अत्यानंदाने तुम्ही त्या दिशेने झेपावता. जवळ जाताच मंत्रमुग्ध करणारा सुगंध तुम्हास बेहोश करतो. स्वर्गच जणु. एवढे दिवस आपणास हा स्वर्ग का सापडला नाही ? असा एक खुळा प्रश्न पडतो. मोह न आवरता तुम्ही त्या मधुकणांवर उतरता. मध चवीष्ट वाटते. घट्ट चिकट मधात तुमचा एक पाय अडकतो. पाय ओढता ओढता, दुसरा पाय चिकटतो. काही कळण्याच्या आतच, तिसरा व चौथा पाय अडकतो. गोड मधात उगाच उतरलो असे वाटू लागते. जीवाची कासावीस सुरु होते. धडपडीत पंखसुद्धा मधात फसतात. थोड्या वेळात वनस्पती तुम्हाला घेरते. अंगात जळजळ सुरु होते. जीवंत रहाण्याची आशा मावळते. तुम्ही जर नशिबवान असाल तर गुदमरुन लवकर मराल पण नसाल तर ताटकळत वेदना सहन करत मराल. अशी आहे घातक दवबिंदू वनस्पतीची मायावी दुनिया !

आपल्या देशात, सह्याद्रीत असलेली जैवविविधता जपणे आपले कर्तव्य आहे. लहान वनस्पतींचा थेट उपयोग मनुष्याला होत नसला तरी त्या वनस्पतींचा इतर जीवसृष्टी बरोबर महत्वाचा संबंध असतो. लहान दुर्मिळ वनस्पती ठराविक नाजुक अधिवासात जगतात. माणसाच्या अतिक्रमणामुळे बहुतांश वन्य अधिवास धोक्यात आले आहेत.

प्रत्येक नैसर्गिक वस्तुचा आपल्याला थेट उपयोग काय ? असा प्रश्न हल्ली सर्व ग्रामीण आणी शहरी नागरिक विचारताना आढळतात. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्व जीवसृष्टीचे संगोपन होणे महत्वाचे आहे. आपण जंगलातुन जाताना, अशा लहान वनस्पती तुडवत तर नाही ना ? याची काळजी घ्या. आपण वन्य प्रदेशात असताना प्रदुषण करतो. त्यामुळे अशा लहान वनस्पती नष्ट होतील का ? याचा विचार करणे मह्त्वाचे आहे.

समायोजन, जगण्यासाठी असलेली धडपड, सुंदर संरचना, अचूक परिणामकारकता अशा अनेक बाबी या लहान वनस्पतीकडुन शिकण्यासारख्या आहेत. "
 

 

 
 
सृष्टिकोन १ : भीमा नदीचे खोरे
 
सह्याद्रीच्या डोंगररांगा दक्षिण गुजरात पासुन केरळ पर्यंत पसरल्या आहेत. दरवर्षी होणाऱ्या हंगामी पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगांतुन असंख्य जलप्रवाह पुर्वेकडे दख्खन च्या पठाराकडे आणी पश्चिमेकडे चिंचोळ्या पश्चिम किनारपट्टी कडे वाहतात
या जलप्रवाहांचे रुपांतर लहान नदयांमध्ये होते. अनेक लहान नदया मिळुन मोठया नद्या तयार होतात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधुन अनेक लहान नदयांचा उगम होतो. या भागातील पुर्वेकडे वाहणाऱ्या उपनदया भीमा नदीस मिळतात. पुढे कर्नाटक राज्यात भीमा नदी कृष्णा नदीला मिळते. आंध्र च्या किनारपट्टीवर कृष्णा नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.
सह्याद्रीच्या पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जुन ते सप्टेंबर च्या काळात अंदाजे ४००० ते ७००० मिलीमीटर पाऊस पडतो. पूर्वेकडे दक्खनच्या पठाराकडे मात्र पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी होते. भीमा व तीच्या उपनद्यांमधील बहुतांश पाणी मुख्यत: सह्याद्रीच्या डोंगररांगामधे होणाऱ्या पावसामुळे वाहते. सह्याद्रीच्या काही डोंगररांगा, दक्खन च्या पठारावर, घाटमाथ्याकडुन पूर्वेकडे, पश्चिम-पूर्व पसरल्या आहेत.

१) माळशेज घाटावर उत्तरेस हरिश्चंद्र डोंगररांग आहे तर त्याच्या दक्षिणेकडे निमगिरी-हटकेश्वर डोंगररांग पसरलेली आहे. हरिश्चंद्र डोंगररांग अंदाजे १५० किलोमीटर लांब (पश्चिम-पूर्व) असुन या डोंगरारांगेच्या उत्तरेस गोदावरीचे खोरे तर दक्षिणेस भीमेचे खोरे आहे. हरिश्चंद्र आणी निमगिरी-हटकेश्वर या दोन डोंगररांगांमधील भागात मांडवी, दुधीवर, पुष्पावती आणी कृष्णावती या पुर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उगम होतो. मांडवी नदीवर चिलेवाडी धरण तर इतर नद्यांवर पिंपळगाव जोगे धरण आहे. दुधीवर, पुष्पावती आणी कृष्णावती य़ा तीन नद्यांचे प्रवाह एकत्र येउन पुढे पुष्पावती नदी वाहते. पुष्पावती आणी मांडवी या नद्यांचा संगम ओतुर जवळ आहे.

२) निमगिरी-हटकेश्वर डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर शिवनेरी डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात कुकडी या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर माणिकडोह धरण आहे. पुष्पावती नदी येडगाव जवळ कुकडी नदीला येउन मिळते. तेथे कुकडी नदीवर येडगाव धरण आहे.

३) शिवनेरी डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर दुर्ग-वरसुबाई डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात मीना या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर वडज धरण आहे.

४) दुर्ग-वरसुबाई डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर भीमाशंकर-गडदुबाई डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात घोड या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर डिंभे धरण आहे. मीना नदी मंचरच्या पूर्वेस पारगाव येथे घोड नदीला येऊन मिळते.

५) भीमाशंकर-गडदुबाई डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर शिंगेश्वर-कुंडेश्वर डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात भीमा आणी अरला या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उगम होतो. या नद्यांवर चास कमान धरण आहे. भीमाशंकर-गडदुबाई डोंगररांगेच्या पुर्व भागातुन वेळ या भीमेच्या उपनदीचा उगम होतो. चास भागात कुमंडला आणी कुंडली या दोन लहान नद्या भीमेला येउन मिळतात.

६) शिंगेश्वर-कुंडेश्वर डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर तसुबाई डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात या पूर्वेकडे वाहणाऱ्या भामा नदीचा उगम होतो. या नदीवर भामा आसखेड धरण आहे.

७) तसुबाई डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर कुसुर टाकवे डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात आंद्रा या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर आंद्रा व ठोकरवाडी धरणं आहेत. आंद्रा नदी इंद्रायणी नदीची उपनदी आहे.

८) कुसुर टाकवे डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर कार्ले डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात कुंडली या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर शिरोटा व उकसण धरणं आहेत. कुंडली नदी इंद्रायणी नदीची उपनदी आहे.

९) कार्ले डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर भातराशी डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात इंद्रायणी या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर लोणावळा धरण आहे. तसुबाई डोंगररांगेच्या नवलाख उंबरे भागात सुधा या इंद्रायणी नदीच्या उपनदीचा उगम होतो. सुधा नदीवर जाधववाडी धरण आहे. सदुंब्रे गावाजवळ सुधा इंद्रायणीला येऊन मिळते.

१०) भातराशी डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर मोरगिरी डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात पवना या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर पवना धरण आहे.

११) मोरगिरी डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर मुळशी डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात मुळा या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर मुळशी धरण आहे. कोळवण खोऱ्यातुन येणारी वाळकी नदी मुळा नदीला येऊन मिळते.

१२) मुळशी डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर निळकंठेश्वर डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात मुठा या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर टेमघर धरण आहे.

१३) निळकंठेश्वर डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर सिंहगड डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात मोसे आणी अंबी या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उगम होतो. या नद्यांवर अनुक्रमे वरसगाव आणी पानशेत धरणं आहेत.

१४) सिंहगड डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर राजगड डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात कानंद आणी गुंजवणी या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांचा उगम होतो. कानंद नदीवर गुंजवणी धरण आहे.

१५) राजगड डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर घेवडेश्वर डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात येळवंडी या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या दोन डोंगररांगांमधील नदीवर भाटघर धरण आहे.

१६) घेवडेश्वर डोंगररांगेच्या दक्षिणेकडे समांतर महादेव डोंगररांग पसरलेली आहे. या दोन डोंगररांगांमधील भागात निरा या पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीचा उगम होतो. या नदीवर निरा देवधर आणी वीर धरणं आहेत. महादेव डोंगररांग अंदाजे २०० किलोमीटर लांब (पश्चिम-पूर्व) असुन या डोंगरारांगेच्या उत्तरेस भीमेचे खोरे तर दक्षिणेस कृष्णेचे खोरे आहे.

१७) पुरंदर तालुक्यातील कर्हा नदी निरा नदीची आणी नगर जिल्ह्यातील सीना नदी भीमा नदीची उपनदी आहे. जिल्ह्याच्या पूर्व टोकाला भीमा नदीवर उजनी धरण आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमा व तीच्या अनेक उपनद्या (एकुण २७) त्यांवरील असंख्य लहान, मध्यम आणी मोठ्या आकाराचे बंधारे/धरणं यामुळे, पुणे जिल्हा जलवैभवी आहे. या पाण्यावर आधारलेले शहरीकरण, बेसुमार औद्योगीकिकरण, शेती आणी अर्थकारण यामुळे पुणे जिल्ह्याचा वेगाने आर्थिक विकास झाला आहे. गेल्या काही वर्षांत विकासाचा प्रवास मात्र वेगाने पश्चिम दिशेकडे नद्यांच्या उगमस्थळांकडे होताना दिसतोय. जिल्ह्यातील भीमाशंकर व ताम्हिणी अभयारण्यातील वनसंपदेवर माणसाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चालु केले आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडे घाटमाथ्यावरील जलसंपदा आणी जैवविविधता जर आपण जपली नाही तर त्याचा थेट परिणाम पूर्वेकडे असलेल्या शेतीकरणावर आणी अर्थकारणावर होणार हे साहजिक आहे. पाण्याचे आणी पाण्याच्या स्त्रोताचे पावित्र्य आणी महत्व वैयक्तिक आणी सामाजिक पातळीवर समजुन घेणे महत्वाचे आहे.

 

 

““ 
The banner has been published here to improve the awareness of the trekkers and tourists visiting the various mountain forts, mountains in north western ghats. Please avoid accidents, by following good outdoor ethics such as no swimming in cisterns at mountain forts, no rock climbing without proper technical equipment and expertise. Please do not adventure, trek with any group or individually without understanding the risks associated. The frequency of the solo trekker fatalities have increased recently. Please strictly avoid solo treks. Please also avoid treks to mountains in large commercial groups, as it leads to damage to biodiversity of these high elevation ecological islands. Please respect the wildlife and biodiversity of the region. This has become more important as the ever increasing human interference is leading to severe damage to fragile ecosystems. Please be aware of the wildlife and biodiversity of the mountains before visiting these mountains. Please follow outdoor ethics. Follow ASI and Forest department rules. The concept of use of symbols for outdoor ethics was conceived and designed by "Sahyadri Trekker Bloggers Group".
 
 
 
 
 


For any queries and suggestions contact at kale_v@rediffmail.com